✨हार्दिक निमंत्रण | Warm Invitation✨

श्री. मोहित चिटणीस – प्रमुख संयोजक (Convener), BMM2026

श्री. मोहित चिटणीस - प्रमुख संयोजक (Convener), BMM२०२६

नमस्कार!

मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका (BMM) ने सिॲटल् महाराष्ट्र मंडळाची (SMM) २०२६ मधील BMM अधिवेशनाचे/ स्नेहसंमेलनाचे यजमान मंडळ म्हणून निवड केली आहे. १९ वर्षांनंतर हे स्नेहसंमेलन पुन्हा सिॲटल् ला ऑगस्ट ६ ते ९, २०२६ या कालावधीत Seattle Convention Center मध्ये होणार आहे.

२०२४ च्या जून महिन्यात सॅन होजे, कॅलिफोर्निया येथे पार पडलेल्या BMM च्या द्वैवार्षिक स्नेहसंमेलनात ही अधिकृत घोषणा करण्यात आली. या मोठ्या घोषणेनंतर, SMM च्या २०२४ च्या कार्यकारी समितीने (EC) आणि विश्वस्त मंडळाने (BOT) सर्वप्रथम स्नेहसंमेलनाच्या प्रमुख संयोजकांची (Convener) नियुक्ती केली. त्यानंतर मुख्य समिती (Core Committee) तयार केली. मुख्य समितीच्या निवडीनंतर, प्रत्येक संचालन समितीसाठी (Steering Committee) समिती-अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष (Chair and Co-Chair) निवडण्याचे काम सुरु झाले. सध्या आपल्या संचालन समितीत ३१ समित्यांसाठी सुमारे ५५–६० अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष नियुक्त झाले आहेत.

या अधिवेशनाबाबत सिॲटल् आणि आसपासच्या परिसरातील अनेक मराठी कुटुंबांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळतो आहे, आणि २०० हून अधिक स्वयंसेवकांनी या समित्यांमध्ये सामील होण्यासाठी नोंदणी केली आहे. BMM ही महाराष्ट्राबाहेरील सर्वात मोठी मराठी संस्था आहे, आणि तिचे स्नेहसंमेलन आपल्या शहरात होणे ही सिॲटल् साठी एक मोठी संधी आणि सन्मानाची बाब आहे.

आपण सर्वजण एकत्र येऊ आणि हे स्नेहसंमेलन यशस्वी करू या. उत्तर अमेरिका तसेच जगभरातून येणाऱ्या मराठी बांधवांना एक अविस्मरणीय अनुभव देऊ या!

जय महाराष्ट्र! जय भारत! God Bless America!

श्री. मोहित चिटणीस – प्रमुख संयोजक (Convener), BMM२०२६

श्री. प्रसाद पानवळकर – अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ (२०२४-२०२६)

श्री. प्रसाद पानवळकर - अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ (२०२४-२०२६)

नमस्कार!

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन हा एक अवर्णनीय सोहळा असतो. मी आत्तापर्यंत पाच अधिवेशनांना उपस्थिती लावली आहे आणि प्रत्येक वेळी मला छान अनुभव आले आहेत.

एका छताखाली चार ते पाच हजार मराठी माणसे बघायला मिळणे हाच एक सुखावह अनुभव असतो आणि त्यातून तीन दिवस मराठी खाणे, दर्जेदार कार्यक्रम, मित्रमंडळींच्या गाठीभेटी, नव्या ओळखी, जमल्यास काही कलाकारांबरोबर फोटो आणि गप्पा … अजून काय पाहिजे?

लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, तसेच व्यावसायिकांपासून ते उत्तर अमेरिकेतील हौशी कलाकारांपर्यंत, सर्वांना सामावून घेणारे असे हे अधिवेशन – हा विलक्षण अनुभव घेतल्यावर अधिवेशनाच्या प्रेमात नाही पडाल तर नवलच.

जर तुम्ही बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन अनुभवले नसेल तर ऑगस्ट २०२६ ला नक्की सिॲटल् ला या. तुम्हाला भेटायला तसेच तुमचे स्वागत करायला मी उत्सुक आहे. तुम्हाला सस्नेह निमंत्रण!

श्री. प्रसाद पानवळकर – अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ (२०२४-२०२६)

संतोष साळवी – खजिनदार, बृहन्महाराष्ट्र मंडळ (२०२४–२०२६)

श्री. संतोष साळवी - खजिनदार, बृहन्महाराष्ट्र मंडळ (२०२४–२०२६)

नमस्कार!

२०१३ मध्ये न्यू इंग्लंड मराठी मंडळाने जेव्हा BMM अधिवेशन आयोजित केलं होतं, तेव्हा मला दोन वर्षं तयारी, नियोजन आणि अंमलबजावणीत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या चार दिवसांत जगभरातून आलेल्या ४,००० हून अधिक मराठी बांधवांचा उत्साह अनुभवणं खरंच अविस्मरणीय होतं. तेव्हापासून आम्ही दोघं—मी आणि माझी पत्नी—BMM अधिवेशनाचे पक्के चाहते झालो आहोत. दरवेळी आमच्यासोबत ८–१० कुटुंबांचाही छानसा ग्रुप असतो, आणि हा प्रवास आमच्यासाठी नेहमीच खास ठरतो.

आम्हा सगळ्यांना अधिवेशनात मराठी चविष्ट जेवण, भारत आणि उत्तर अमेरिकेतील सुंदर कार्यक्रम, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे—जगभरातील मराठी बांधवांशी गप्पा मारत त्यांच्या यशोगाथा ऐकण्याचा आनंद मिळतो.

यंदा तुम्हा सर्वांना मनापासून आमंत्रण आहे—ऑगस्ट २०२६ ला सिॲटल अधिवेशनाला नक्की या!

  • तिथलं आल्हाददायक हवामान
  • अप्रतिम मराठी खाद्यपदार्थ
  • BMM चे वेगवेगळे उपक्रम
  • व्यापार परिषद (B-CONNECT)
  • सांस्कृतिक कार्यक्रमांचा रंगतदार मेळा

सगळंच तुम्हाला नक्की भावेल.

आमचे सर्व स्वयंसेवक मनापासून मेहनत घेत आहेत, आणि आम्हाला खात्री आहे की हा अनुभव तुमच्या आयुष्यातील एक सुंदर आठवण बनेल.

मग ठरलं—सिॲटल २०२६ अधिवेशनात आपण सगळे भेटूच! 🌺

आपला,

श्री. संतोष साळवी – खजिनदार, बृहन्महाराष्ट्र मंडळ (२०२४–२०२६)

श्री. नितीन जोशी – विश्वस्त समिती, बृहन्महाराष्ट्र मंडळ (२०२४-२०२६)

श्री. नितीन जोशी - विश्वस्त समिती, बृहन्महाराष्ट्र मंडळ (२०२४-२०२६)

नमस्कार!

बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. मराठी भाषा, संस्कृती आणि कला ह्यांचा त्रिवेणी संगम इथे घडून येतो. मित्रांच्या भेटी, सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजन आणि अस्सल मराठी सुग्रास भोजन! ऑगस्ट ६-९, २०२६ रोजी सिॲटल् मध्ये हे बाविसावं अधिवेशन संपन्न होणार आहे. २००७ सालानंतर १९ वर्षांनी सिॲटल्-कर पुन्हाएकदा आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. अमाप उत्साह, कुशल नेतृत्व आणि अभिनव तंत्रज्ञ घेऊन हा सोहळा संपन्न करण्यासाठी २०० हून अधिक स्वयंसेवक सज्ज झाले आहेत.

आपल्या मातृभूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्या कर्मभूमीत विखुरलेल्या सर्व मराठी बांधवांची एकजूट इथे अनुभवता येते. चार दिवस चालणारा हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. उत्तररंग, रेशीमगाठी, बी-कनेक्ट हे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे उपक्रम, उत्तर अमेरिकेतल्या आणि भारतातल्या कलाकारांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, विद्वानांची व्याख्याने, सामाजिक कार्याचा गौरव हे सर्व इथेच प्रकाशित होतं.

चला तर मग मंडळी २०२६ मध्ये अधिवेशनाला अवश्य या. आपल्या नात्यांची वीण दृढ करूया, नवीन नाती आणि स्नेह संपादन करूया. हे सर्व तुमच्याचसाठी घडवून आणणाऱ्या सिॲटल्-वासीयांचं मनोगत कविवर्य सुधीर मोघे ह्यांच्या शब्दात सांगतो,

“लखलखणारे हे तारांगण झुकून खाली येईल पळभर तुझियासाठी
सुरलोकीचा कल्पतरूही ह्या मातीतुन रुजून येईल तुझियासाठी”

श्री. नितीन जोशी – विश्वस्त समिती, बृहन्महाराष्ट्र मंडळ (२०२४-२०२६)