मंडळी लिहिते व्हा!

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०२६ च्या सिॲटल् स्नेहसंमेलनाची तयारी जोमाने चालू आहे आणि आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करायला उत्सुक आहोत. ह्या स्नेहसंमेलनाच्या स्मरणिका समितीकडून तुम्हा सर्व उत्साही लेखक मंडळींना तुमची लेखणी सरसावायला साद देत आहोत. त्याला जरूर प्रतिसाद द्या! लिहिते व्हा! तुमची शब्दकळा आपल्या स्मरणिकेच्या पानांतून बहरू द्या!

खूप दिवसात मनात घोळणारं काही
खोल खोल रुजलेलं काही!
पाहिलेलं, जाणवलेलं
वाचलेलं, अनुभवलेलं
हळवं, हसरं आल्हाददायी…
अक्षरातून बरसू दे!
लेखणीतून साकार होऊ दे!

मंडळी, विषयाला बंधन नाही… कथा, कविता, लेख, विनोद, पाककृती, शब्दकोडी, ललित, तात्विक, वैचारिक, चिंतनपर, मुक्त अश्या अनेक आयामातून तुमची लेखणी संचार करू देत!

आणि हो…
पाककृती पाठवत असाल तर पारंपारिक, विस्मृतीत गेलेला पदार्थ तुम्ही स्वतः तयार करून त्याचे छायाचित्र पाककृती सोबत पाठवा. आजीच्या हातचे मधुर राघवदास लाडू, आईने केलेल्या खमंग भाजणीच्या थालीपीठ, काकूने केलेली मेथीची चटकदार पचडी… दिंडी, घावन घाटलं, सांदण, गुळवणी, आंबील, पाटवड्या, पघळणी, गुळवणी, गोळ्यांची आमटी, घुटं, आंबट वरण अशा आणि कितीतरी खास मराठी जुन्या चवींना नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याची ही संधी! चला, महाराष्ट्रीय स्वादाची परंपरा स्मरणिकेत जपूया!

स्मरणिकेसाठी साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५

कथा स्पर्धा

मंडळी, स्मरणिका समिती तुमच्यासाठी कथांची स्पर्धा घेऊन येत आहे. तुमच्या कल्पक विचारांना गती द्या आणि तुम्ही लिहिलेल्या आकर्षक आणि रंजक कथा स्मरणिकेसाठी पाठवा.

नियम:

१. कथा ही पूर्णपणे स्वरचित आणि मौलिक असावी.
२. कथा कोणत्याही प्रकारची असू शकते (गंभीर, विनोदी, सामाजिक, गूढ, काल्पनिक इत्यादी), जोपर्यंत ती विषयाशी सुसंगत आहे.
३. कथा मराठीतच असावी.
४. शब्दमर्यादा: १००० ते १२०० शब्दांदरम्यान.

तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला smaranika@bmmseattle2026.org येथे संपर्क साधू शकता.