नमस्कार!
मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका (BMM) ने सिॲटल् महाराष्ट्र मंडळाची (SMM) २०२६ मधील BMM अधिवेशनाचे/ स्नेहसंमेलनाचे यजमान मंडळ म्हणून निवड केली आहे. १९ वर्षांनंतर हे स्नेहसंमेलन पुन्हा सिॲटल् ला ऑगस्ट ६ ते ९, २०२६ या कालावधीत Seattle Convention Center मध्ये होणार आहे.
२०२४ च्या जून महिन्यात सॅन होजे, कॅलिफोर्निया येथे पार पडलेल्या BMM च्या द्वैवार्षिक स्नेहसंमेलनात ही अधिकृत घोषणा करण्यात आली. या मोठ्या घोषणेनंतर, SMM च्या २०२४ च्या कार्यकारी समितीने (EC) आणि विश्वस्त मंडळाने (BOT) सर्वप्रथम स्नेहसंमेलनाच्या प्रमुख संयोजकांची (Convener) नियुक्ती केली. त्यानंतर मुख्य समिती (Core Committee) तयार केली. मुख्य समितीच्या निवडीनंतर, प्रत्येक संचालन समितीसाठी (Steering Committee) समिती-अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष (Chair and Co-Chair) निवडण्याचे काम सुरु झाले. सध्या आपल्या संचालन समितीत ३१ समित्यांसाठी सुमारे ५५–६० अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष नियुक्त झाले आहेत.
या अधिवेशनाबाबत सिॲटल् आणि आसपासच्या परिसरातील अनेक मराठी कुटुंबांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळतो आहे, आणि २०० हून अधिक स्वयंसेवकांनी या समित्यांमध्ये सामील होण्यासाठी नोंदणी केली आहे. BMM ही महाराष्ट्राबाहेरील सर्वात मोठी मराठी संस्था आहे, आणि तिचे स्नेहसंमेलन आपल्या शहरात होणे ही सिॲटल् साठी एक मोठी संधी आणि सन्मानाची बाब आहे.
आपण सर्वजण एकत्र येऊ आणि हे स्नेहसंमेलन यशस्वी करू या. उत्तर अमेरिका तसेच जगभरातून येणाऱ्या मराठी बांधवांना एक अविस्मरणीय अनुभव देऊ या!
जय महाराष्ट्र! जय भारत! God Bless America!
- मोहित चिटणीस
प्रमुख संयोजक (Convener), BMM २०२६