नमस्कार!

२०२६ साली होणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळ स्नेहसंमेलनाच्या संयोजन समितीकडून आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार! येणारं स्नेहसंमेलन Emerald City म्हणून ओळखल्या जाणार्‍या आमच्या सिॲटल् शहरात ६ ते ९ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. निसर्ग आणि तंत्रज्ञान अश्या दोन्हीसाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या शहरांत मराठी समाजाने चांगलेच बस्तान बसवले आहे. त्यामुळेच २००७ सालच्या यशस्वी आयोजनानंतर २०२६ साली पुन्हा एकदा बृहन्महाराष्ट्र मंडळ स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यासाठी आम्ही कंबर कसून तयारीला लागलो आहोत!

आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीने या आधीची स्नेहसंमेलने यशस्वी झालेली आहेत आणि येत्या स्नेहसंमेलनातही आपण उपस्थित रहाल ह्याची आम्हाला खात्री वाटते. बहारदार कार्यक्रम, चटकदार मराठी जेवण, व्यावसायिकांना संधी, विविध स्पर्धा तसेच शाळा, युवा, रेशिमगाठी, उत्तररंग ह्यांसारखे बृहन्महाराष्ट्र मंडळांचे उपक्रम ह्यांची रेलचेल स्नेहसंमेलनात असणार आहे.

वैयक्तिक प्रायोजकांसाठी आम्ही खास पॅकेजेस तयार केली आहेत. त्याची माहिती तुम्ही ह्या लिंकवर बघू शकता: https://bmmseattle2026.org/individual-donor-package-tiers प्लॅटीनम पॅकेजवरची $ २०००ची सवलत ३० जून २०२५ ला संपत आहे, त्यामुळे त्वरा करा! तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्याशी ह्या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधा. आमचे कार्यकर्ते तुम्हाला योग्य पॅकेज निवडायला मदत करतील.

गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही स्नेहसंमेलनात सादर होणार्‍या कार्यक्रमांचे प्रस्ताव स्विकारण्यास सुरूवात केली. सांगायला आनंद होत आहे की भारतातील तसेच उत्तर अमेरिकेतल्या कलाकारांकडून कार्यक्रमांचे प्रस्ताव यायला सुरूवात झाली आहे. उत्साही सुरूवात बघून आपल्याला दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी मिळणार ह्याची आम्हाला खात्री वाटते आहे! आपण आपल्या कार्यक्रमांचे प्रस्ताव https://bmmseattle2026.org/programming-rfp ह्या लिंकवरून पाठवू शकता. उत्तर अमेरिकेतल्या कलाकारांच्या कार्यक्रमांसाठी प्रस्ताव पाठवण्याची अंतिम मुदत दिवाळी पाडवा म्हणजे २२ ऑक्टोबर २०२५ तर भारतातून आणि परदेशांतून येणार्‍या कलाकारांच्या कार्यक्रमांसाठी प्रस्ताव पाठवण्याची अंतिम मुदत अनंत चतुर्दशी म्हणजे ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. आपले प्रस्ताव पाठवण्यासंबंधी कुठलीही अडचण आल्यास किंवा काही शंका असल्यास programmingrfp@bmmseattle2026.org ह्या इमेल-पत्त्यावर आमच्याशी नक्की संपर्क साधा.

स्नेहसंमेलनात आयोजित केल्या जाणार्‍या नाट्यसृजन (https://bmmseattle2026.org/natyasrujan-ekankikaspardha) ह्या एकांकिका स्पर्धेसाठी ज्यांनी त्वरित प्रतिसाद दिला त्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या नाव नोंदणीमुळे आमचा उत्साह अजून वाढला आहे. उत्तम दर्जेदार एकांकिकांच्या स्पर्धा बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ज्या मंडळींना ह्या स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा आहे आणि काही कारणास्तव अजून नावनोंदणी करता आलेली नाही त्यांनी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत नावनोंदणी करावी ही विनंती! आत्ता आम्हाला फक्त तुमची सहभागी होण्याची इच्छा कळवा, बाकी तपशील नंतर कळवू शकतो. एकांकिका आमच्याकडे पाठवण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२५ आहे. नावनोंदणीबद्दल कुठली अडचण असल्यास किंवा काही शंका असल्यास आमच्याशी ekankika@bmmseattle2026.org ह्या इमेल पत्त्यावर संपर्क साधावा.

संमेलनाची स्मरणिका समिती सर्व उत्साही लेखक मंडळींकडून साहित्य मागवत आहे. स्मरणिकेसाठी कथा स्पर्धेचीही घोषणा झालेली आहे. ह्याबद्दल सर्व माहिती आमच्या संकेतस्थळावर मिळेल. https://bmmseattle2026.org/smaranika

२०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची फौज हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी झटत आहे. आपल्याला अतिशय उत्तम अनुभव मिळेल ह्याची आम्ही खात्री देतो! संमेलनासंबंधीच्या आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रश्नांसाठी info@bmmseattle2026.org ह्या इमेल-पत्त्यावर संपर्क साधा. आपण संमेलनाशी संबंधित बातम्या, घडामोडी आणि गमती जमती आमच्या समाजमाध्यमांतून बघू शकता (फेसबूक: https://www.facebook.com/bmm2026seattle; इंस्टाग्राम: https://www.instagram.com/bmm2026seattle).

नक्की भेटूया!